सरकारी बँकेत तब्बल ६२१० कोटींचा गैरव्यवहार   

अध्यक्षच सुत्रधार, ED कडून अटक

नवी दिल्ली : ED म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाच्या कोलकाता येथील टीमने सरकारी बँकेत मोठा गैरव्यवहार समोर आणला. यूको बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार गोयल यांना दिल्लीतून अटक केली आहे. १६ मे २०२५ रोजी गैरव्यवहार कायद्यांतर्गत (PMLA) सुबोध गोयल यांना अटक झाली. कंकास्ट स्टील अँड पॉवर लिमिटेड आणि इतराबरोबर झालेल्या बँक फसवणूक प्रकरणी ही कारवाई केली. १७ मे रोजी गोयल यांना कोलकाता येथील PMLA न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना २१ मे पर्यंत ईडीच्या ताब्यात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

६२१० कोटी रुपयांचा गैरव्यवहार 

CBI ने दाखल केलेल्या FIR च्या आधारावर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. कंकास्ट स्टील अँड पॉवर लिमिटेडने यूको बँक आणि इतर बँकांकडून घेतलेल्या कर्जात मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. हा गैरव्यवहार जवळपास 6210.72 कोटी रुपयांचा आहे.

गैरव्यवहार कसा केला?

ईडीच्या तपास समोर आले की, सुबोध कुमार गोयल यांच्या कार्यकाळात यूको बँकेने कंकास्ट स्टील कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्ज दिले. हे कर्ज नंतर चुकीच्या पद्धतीने वळवले आणि त्याचा गैरवापर करण्यात आला. या बदल्यात गोयल यांनी अवैधपणे रोख रक्कम, महागड्या मालमत्ता, चैनीच्या वस्तू आणि हॉटेल बुकिंगसारख्या सुविधा घेतल्या. या सर्व बेकायदा सुविधा, पैसे हे शेल कंपन्या, बनावट लोक आणि नातेवाईकांच्या माध्यमातून घेण्यात आल्या. यामुळे त्यांची खरी ओळख लपवता आली.अंमलबजावणी संचालनालय या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे आणि लवकरच आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
 

Related Articles